मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्ली येथील घरात चोरी झाल्याची माहिती समोर आली होती. यावेळी चोरट्यांनी घरातून २.४५ कोटी रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. यासंदर्भात सोनम कपूरच्या सासूने तुगलक रोड येथील ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

नंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. तर आता पोलिसांना या चोरट्यांना पकडण्यात यश आले असून त्यांनी चोरीला गेलेले करोडो रूपये आणि दागिने हस्तगत केले आहेत. दिल्ली पोलिसांनी क्राईम ब्रांच आणि नवी दिल्ली डिस्ट्रिक्ट पोलीस यांच्या मदतीने जॉइंट ऑपरेशद्वारे या प्रकरणाचा छडा लावला.

या प्रकरणात पोलिसांनी अपर्णा रूथ विल्सन नावाच्या एका महिलेला आणि तिचा पती नरेश कुमार सागरला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अपर्णा विल्सन ही महिला नर्स म्हणून आहुजा यांच्या घरी सोनमच्या आजीसासूचे देखभाल करत असत. तर अपर्णाचा पती नरेश कुमार, शकरपूर येथील एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करत असत.

अधिक वाचा  पालघरमध्ये मद्यधुंद चालकामुळे वाघोबा घाटात बस 25 फूट खोल दरीत कोसळली

२०२१ पासून ही महिला आहुजा यांच्या घरी नर्स म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिजोरीत दागिने आणि रोख रक्कम ठेवलेले असल्याचे तिने पाहिले होते. त्यानंतर तिने पतीसोबत मिळून दागिने आणि पैसे चोरण्याचा कट रचला. त्यानुसार मागील १० ते ११ महिन्यांदरम्यान तिने तिजोरीतील दागिने आणि पैसे चोरले आणि संधी मिळताच ते दागिने विकले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या दोघा दाम्पत्यांनी दागिने विकून मिळालेले पैसे आणि चोरलेल्या पैशांतून त्यांचे कर्ज फेडले. तसेच काही पैसे त्यांच्या पालकांच्या आरोग्यासाठी खर्च केले आणि त्यांचे घर रिनोव्हेट करण्यासाठी वापरले. एवढेच नाही तर त्यांनी एक हुंडाई आय १० कारसुद्धा खरेदी केली. तर पोलिसांनी ही कार हस्तगत केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांना पकडल्यानंतर त्यांनी दागिने विकलेल्या सोनारालाही अटक केली आहे. या सोनाऱ्याचे नाव देव वर्मा असे असून पोलिसांच्या तपासात देव यांनी अपर्णा आणि नरेश या दाम्पत्याकडून सोनं खरेदी केल्याचे मान्य केले. तसेच या बदल्यात रोख आणि इलेक्ट्रॉनिक व्यवहाराद्वारे पैसे दिल्याचे त्यांनी कबूल केले.

अधिक वाचा  वयाच्या 54 व्या वर्षी 'या' बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ

दरम्यान, पोलिसांनी देव वर्मा यांच्याकडून १ कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. यामध्ये १०० हिरे आणि सहा सोन्याचे चैन, हिऱ्यांच्या बांगड्या, एक हिऱ्याचे ब्रेसलेट, दोन कानातले आणि एक पितळीचं नाणं अशा दागिन्यांचा समावेश आहे. तसेच इतरही अन्य वस्तू हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांद्वारे सांगण्यात आले.

अनिल कपूर यांनी मानले दिल्ली पोलिसांचे आभार

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी चोरांना अटक केल्यानंतर सोनमचे वडिल अभिनेता अनिल कपूर यांनी एक ट्विट करत पोलिसांचे आभार मानले. त्यांनी लिहिले की, ‘शहरात गुन्हेगारी प्रकरण सोडवण्यात दिल्ली पोलीस ज्याप्रकारे कामगिरी करत आहेत त्यासाठी त्यांचे कौतुक. आहुजा यांच्या घरी झालेल्या चोरीचे प्रकरण लवकर मिटवण्यासाठी आम्ही दिल्ली पोलिसांचे आभारी आहोत’.

अधिक वाचा  संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत; संभाजीराजे यांची मागणी अखेर मान्य

काय आहे प्रकरण ?

सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजाचे दिल्लीतील अमृता शेरगिल मार्ग येथे घर आहे. या घरात सोनमचे सासरे हरीश आहुजा, सासू प्रिया आहूजा आणि आनंद आहुजाची आजी सरला आहूजा राहतात. तर फेब्रुवारी महिन्यात या घरात चोरट्यांनी २.४५ कोटी रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर सोनम कपूरच्या सासूने यासंदर्भात तुगलक रोड येथील ठाण्यात तक्रार दाखल केली.

सोनमची आजीसासू सरला आहुजा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ११ फेब्रुवारी रोजी घरात चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी जवळपास दोन वर्षानंतर त्यांचा कपाट उघडून दागिने तपासले असता त्यांना कपाटात दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेचच त्यांनी याबाबत घरातल्या मंडळींना माहिती दिली.