मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भात राज्य शासनाला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर गृहमंत्री आणि, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. भोंग्याचा प्रश्न निकाली निघालेला नसतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारकडे आणखी एक मागणी केली. मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, मात्र मशिदीत सीसीटीव्ही का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत नांदगावकर यांनी लवकरात लवकर मशिदीसह सर्व धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी केली. त्यांच्या या प्रश्नाचा गृहमंत्री वळसे पाटलांनी एका वाक्यात निकाल लावला.

अधिक वाचा  गुजरात टायटन्सची फायनलमध्ये दमदार एन्ट्री; राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय

मंदिरात सीसीटीव्ही कंपलसरी लावण्यासंबंधी कुणी सूचना दिलेल्या नाहीयेत. मंदिरात स्वेच्छेने किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले असतील किंवा इतरही धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावायचे असतील तर सरकारचा विरोध असण्याचं काही कारण नाही. ज्याने त्याने आपापल्या स्वच्छेने निर्णय घ्यावा, सरकारचं काही म्हणणं नाही. हा निर्णय पूर्णत: ऐच्छिक असल्याचं देखील गृहमंत्र्यांनी ठासून सांगितलं. एकंदर मनसेच्या प्रश्नाचा गृहमंत्र्यांनी एका वाक्यात निकाल लावला.

कुठल्याही कायद्यामध्ये स्पीकर लावणे किंवा उतरवणे हे सरकारचं काम नाही, सरकारची जबाबदारी नाही. ज्याला लाऊड स्पीकर लावायचा आहे, त्याला पोलिसांनी परवानगी घेऊनच लाऊड स्पीकर लावता येतील, अशा स्पष्ट शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

अधिक वाचा  "पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या” मनसेचे शिवसेनेवर टीकास्त्र

बाळा नांदगावकर यांनी काय मागणी केली होती?

‘जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, परंतु मशिदीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसंच असं करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली होती.