मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्या यांना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर टीका केली होती. त्यामुळे आता संजय राऊतांना हीच टीका भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण इंडियन बार असोसिएशनने हायकोर्टात संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही नोटीस बजावण्याची मागणी करण्यात आली आहे.

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. त्यावेळी न्यायालय किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांना झुकतं माप देत असल्याची टीका संजय राऊतांनी केली होती. भाजपच्या नेत्याना लवकरच दिलासा मिळतो. दिलासा देण्यासाठीच न्यायव्यवस्थेत भाजपचे लोक बसविण्यात आले आहेत का? महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलासा का मिळत नाही? असे सवाल संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर उपस्थित केले होते. त्यामुळे इंडियन बार असोसिएशनने संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सुमोटो अवमान याचिका दाखल करुन राऊतांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अधिक वाचा  OBC आरक्षणावरून आघाडीत बिघाडी? पटोलेंचा मुख्यमंत्र्यांनाही अप्रत्यक्ष इशारा

न्यायव्यवस्थेवर टीका करणे योग्य नाही. संजय राऊत हे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायव्यवस्थेबाबत बोलताना सांभाळून बोलावं, असं याचिकेत म्हटलं आहे. तसेच सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनाही नोटीस बजावून स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी बार असोसिएशनने केली आहे. त्यामुळे याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.