उस्मानाबाद – राज्य आणि केंद्र सरकारचं हे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच धार्मिक प्रश्न उपस्थित करून एकमेकांवर चिखलफेक केली जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्ताने राजू शेट्टी मंगळवारी तुळजापुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महागाईचे अपयश लपवण्यासाठी भाजप ईडी व धार्मिक प्रश्न उपस्थित करून राज्यात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, तर राज्य सरकारही विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यात आपला वेळ खर्ची घालत आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यापेक्षा इंधन दरवाढ, वीजप्रश्नी पुढाकार घ्यावा, असा सल्ला राजू शेट्टींनी दिलाय.

अधिक वाचा  अयोध्येतला ट्रॅप, व्हाया राणा ते अफजल खानाची कबर... राज ठाकरेंच्या भाषणाचे हे मुद्दे

राज्यात सध्या कोळसाटंचाई असल्याचे सांगण्यात येत आहे. इकडे कोळशाची टंचाई दाखवायची अन् दुसरीकडे बेसुमार भावाने वीज खरेदी करून पैसे लाटायचे, यासाठी हा खटाटोप आहे. वीज खरेदी करण्यापेक्षा कोळसाच का खरेदी करीत नाही, असा आरोपही शेट्टी राज्य सरकारवर केला.

ऊस हे शेतकऱ्यांना आळशी बनवणारे पीक असल्याचं वक्तव्य खासदार शरद पवार यांनी केलं आहे. त्यावर राजू शेट्टी म्हणाले की, ऊस हे शेतकऱ्यांचे आळशी पीक नाही. ते हमीभाव देणारे खात्रीचं पीक असल्याने शेतकरी त्याचं उत्पादन घेतात. माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांना हे माहिती नाही का, असा सवालही शेट्टी यांनी केला.