मुंबई : अॅम्वे कंपनीला ईडीने दणका दिला असतानाच अशाच प्रकारच्या नेटवर्क मार्केटिंग पद्धतीने पालिका तसेच खासगी रुग्णालयांतील असंख्य विद्यार्थी डॉक्टरांना मलेशिया येथील कंपनीने जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून कंपनीचे सदस्यत्व घेण्यासाठी या तरुण डॉक्टरांकडून पाच ते नऊ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र दरमहा कबूल करण्यात आलेले हजारो रुपयांचे कमिशन आणि महागड्या भेटवस्तू वर्ष उलटूनही डॉक्टरांना मिळाल्या नाहीत. मलेशियातील कंपनीनेही या डॉक्टरांच्या मेलना प्रतिसाद दिलेला नाही. केईएम रुग्णालयातील डॉ. आदित्य अणवेकर यांनी शीव पोलिस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

संबंधित डॉक्टरांनी पैसे भरल्यानंतर या कंपनीतर्फे झूम मीटिंगद्वारे पिरॅमिड पद्धतीने नवे ग्राहक तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. पहिल्या टप्प्यात कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रिणींना जोडून घ्या, असेही सांगण्यात येते. एका ग्राहकाला या साखळीशी जोडून घेतल्यानंतर त्यावर कमिशन देण्याचे आश्वासन मिळते. डॉक्टरांना दिवसातील तीन तास यासाठी द्यावे लागतात. या भूलथापांना बळी पडून मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, जळगावसह राज्याच्या इतर वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी डॉक्टरांनीही झटपट श्रीमंत होण्याच्या नादापायी पैसे मोजले.

अधिक वाचा  वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ; राऊतांचं ट्वीट,फडणवीसांना दिलं उत्तर

पालिकेच्या लोकमान्य टिळक रुगणालयाच्या ऑर्थोपेडिक विभागासह कूपर रुग्णालयातील रजिस्ट्रार या कंपनीसाठी पूर्णवेळ काम करतात, अशी खात्रीदायक माहिती हाती आली आहे. हे काम ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने वैद्यकीय सेवेवर त्याचा परिणाम होत नाही, असा युक्तिवाद या डॉक्टरांकडून केला जातो. ‘मटा’ने फसवणूक झालेल्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यातील अनेकांनी स्वतःसह आई, वडील, बहीण, भाऊ तसेच मित्रमैत्रिणींना यामध्ये जोडून घेतल्याने त्यांचेही पैसे बुडाले आहेत. वैद्यकीय कामामध्ये व्यग्र असलेल्या डॉक्टरांना यात वेळ देता येत नसल्याने अनेक डॉक्टरांनी हे काम सोडून दिले. काही रक्कम वगळून उरलेले पैसे परत करण्यासंदर्भात ज्या डॉक्टरांनी विचारणा केली, त्यांना तुम्ही नव्या सदस्यांना जोडून न दिल्याने पैसे तसेच भेटवस्तू देणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले. पैसे गुंतवताना या डॉक्टरांना ते परत मिळण्याच्या धोरणाबद्दल ऑनलाइन मीटिंगमध्ये सांगण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याबद्दल कधीही माहिती देण्यात आली नाही.

अधिक वाचा  'हाच फडणवीस तुमच्या सत्तेच्या (बाबरी) ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही'

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार भेटवस्तू म्हणून देण्यात आलेले घड्याळ, सोन्याचे दागिने तसेच इतर भेटवस्तूंची एकत्रित किंमत ४० हजार रुपयेही नसल्याचे समजले. सोन्याचा मुलामा दिलेले खोटे दागिनेही डॉक्टरांच्या गळ्यात मारण्यात आले. काम करायचे नसल्यास पैसे परत करू असे सांगणाऱ्या डॉक्टर मध्यस्थांनी आता चार ते पाच वर्षांत पैसे देतो, असे सांगून हात वर केले आहेत. ज्यांनी हे काम मध्येच सोडले, त्यांना कंपनीचे आयकार्ड तसेच इतर कागदपत्रे परत करा, यासाठी सातत्याने फोन येत आहेत. या प्रकारासंदर्भात कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते व लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांना कल्पना देण्यात आल्यावर त्यांनी या प्रकारामध्ये कोणत्याही डॉक्टरांनी गुंतू नये, असे स्पष्ट केले.

अधिक वाचा  अमित शाह यांचा 'तो' फोटो व्हायरल केल्यामुळे बॉलीवूड दिग्दर्शकाला पडलं महागात, गुन्हा दाखल

पैसे परत देण्यात टाळाटाळ

केईएम रुग्णालयातील डॉ. आदित्य अणवेकर यांना अवघ्या सात दिवसांमध्येच या प्रकरणामध्ये काळेबेरे असल्याचे लक्षात आले. त्यांनी ९ सप्टेंबर, २०२१ रोजी यामध्ये काम करायचे नसल्याचा निर्णय कळवला व कूपर रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या मध्यस्थांकडे पैसे परत द्या, अशी मागणी केली. मात्र त्यांनी कंपनी मलेशियामध्ये असल्याने आता पैसे परत देता येणार नाही, असे सांगितले. या कंपनीने आदित्य यांना पूर्वकल्पना न देता त्यांच्या नावावर ‘ट्रीपवर्स एक्स्ट्रा’ तसेच सिल्व्हर क्लबचे सदस्यत्व घेतले.