सांगली : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी (स्व.) आर. आर. आबा पाटील यांनी मोठे कष्ट घेतले होते. आर. आर. आबांची पोकळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीही भरून काढू शकत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अभिप्रेत असलेले काम आबांनी महाराष्ट्रात करून दाखवले. आबांचे स्वप्न आपल्याला २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण करायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात होती. या मतदारसंघाची आढावा बैठक आर. आर. आबांचे गाव असलेल्या अंजनी येथे घेण्यात आली. त्या आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव तालुक्यातील उर्वरीत गावांना पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. येथील सर्व गावांना पाणी पुरविण्यासाठी लवकरच उपाय योजना करण्यात येतील.

अधिक वाचा  अखेर ठरलं! मुख्यमंत्री ठाकरे राज्य दौरा करणार; संभाजीनगरला सभा

आज लोक खत, गॅसचे दर कमी करावेत; म्हणून आमच्याकडे मागणी करतात. पण याचे दर कमी करणे आमच्या हातात नाही. खतांचे दर मोदी सरकार वाढवते. इंधनाचे दरही आज प्रचंड वाढले आहेत. अशावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन दरवाढीबद्दल लोकांना जागृत करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, आपण शाहू-फुले-आंबेडकरांना मानतो; म्हणून लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे म्हणता येणार नाही. कारण, आपल्याला लोकांना फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार समजावून सांगावे लागतील. या महापुरुषांचे विचार जेव्हा आपण तळागाळात रुजवू, तेव्हाच आपल्या पक्षाच पाया व्यापक होईल.

अधिक वाचा  यशवंत जाधवांचा पाय खोलात! तब्बल ६ कोटींच्या दागिन्यांची रोखीने खरेदी केल्याचे उघड

या वेळी आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण अण्णा लाड, सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महिला आयोगाच्या राज्याच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रतीक पाटील, सांगलीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शंकर पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, अनिता सगरे, सुश्मीता जाधव, युवक जिल्हा अध्यक्ष विराज नाईक, युवती जिल्हा अध्यक्ष पुजा लाड, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.