सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेल्या मुद्दा म्हणजे मशिदींवरील भोंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये या मुद्द्याला हात घातल्यानंतर १२ एप्रिलच्या सभेमध्ये पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेचं अल्टीमेटम दिलं आहे. असं न झाल्यास आपण मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवू असं राज यांनी म्हटलंय. मात्र यामुळे राज्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज ठाकरेंवर टीका करतानाच थेट त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच राज यांना आवर घालण्याची विनंती केलीय.

अधिक वाचा  लोकसभा उमेदवार ठरवण्याच्या बैठकीत हाणामारी; लाथा-बुक्क्यांनी मारहाण बैठक उधळली आणि पुढे राडाच

साताऱ्यामध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण माने यांनी, “राज ठाकरेंचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी केलीय. इतकच नाही तर पुढे बोलताना माने यांनी, “मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” असं आवाहन केलं आहे. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर (राज ठाकरेंवर) गुन्हा दाखल केला नाही तर प्रसंगी मी स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे,” असं इशाराही लक्ष्मण मानेंनी दिलाय.