सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेले अॅड गुणरत्न सदावर्तेंचा पुढचा मुक्काम आता विदर्भात असणार आहे. संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांची दिशाभूल करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सदावर्ते यांचा ताबा घेण्याची अकोला पोलिसांना परवानगी मिळाली आहे. चौकशी कामी सदावर्तेंचा ताबा मिळावा आणि त्यांना अकोट येथे आणण्याची परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांनी केलेला विनंती अर्ज अकोट प्रथमवर्ग न्यायालयाने मंजूर केला आहे.

दरम्यान, चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले आहेत. ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या २ दिवसात आकोट पोलिसांचे पथक सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याआधीच या प्रकरणातील सहआरोपी अजय गुजर व प्रफुल्ल गावंडे हे अकोला पोलिसांच्या ताब्यात आहेत. अकोला पोलिसांव्यतिरीक्त पुणे, कोल्हापूर आणि बीड पोलिस देखील सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी रांगेत उभे आहेत.

अधिक वाचा  मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड जयश्री पाटील यांच्यासह अन्य २ जणांविरुद्ध अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ४०० रुपये गोळा करून तब्बल ७४ हजार कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जानेवारी महिन्यातच मालोकार यांनी अकोट पोलिसांकडे नोंदवली होती.

यापूर्वी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सदावर्ते यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याविषय आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या संदर्भात साताऱ्यातील शहर पोलिस ठाण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल झालेला होता. याप्रकरणी सातारा पोलिसांनी त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले होते. साताऱ्यात आणून त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले होते. यावरून त्यांना १८ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर काल न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.