पुणे : काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब येथील सीमावर्ती भागांत भारतीय सैनिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना केली, त्यानंतर आता थेट सियाचीनमध्ये भारतीय सीमेवर सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती विराजमान होणार आहे. भारतीय लष्करातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांकडे दगडूशेठ गणपतीची दोन फुटांची मूर्ती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली.

सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येतच असे नाही. त्यामुळे २२ मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये सर्वधर्म स्थळावर करण्याची इच्छा बटालियनतर्फे व्यक्त केली.

अधिक वाचा  केंद्राचा मोठा निर्णय, १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर घातले निर्बंध

ट्रस्टने याची दखल घेत दोन फूट उंचीची प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. ही मूर्ती पुण्यातील मूर्तिकार भालचंद्र देशमुख यांनी साकारली असून, नुकतीच ही मूर्ती बटालियनच्या माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर या जवानांकडे देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, प्रकाश चव्हाण, माऊली रासने, सिद्धार्थ गोडसे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.