सांगली : जनता आक्रोश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस कसली संवाद यात्रा करत आहे? त्यांना काही भान असेल, तर त्यांनी जनतेच्या दुखण्यावर बोलावे. अन्यथा, त्यांची संवाद यात्रा संपताच भाजपकडून पोलखोल आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी दिला.

ते म्हणाले की, ‘राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संवादयात्रा करत आहेत. ती नागरिकांसाठी आहे की राजकीय सोयीसाठी. २०२१ च्या महापुराला कोण जबाबदार होते? जलसंपदा खात्याचे अपुरे नियोजन आणि जलसंपदा मंत्र्यांची ‘पुराचा करेक्ट कार्यक्रम करू’ अशी व्हिडिओ क्लिप यामुळे लोक गाफिल राहिले. शेतकरी, व्यापारी व जनतेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्याचे उत्तर संवाद यात्रेत द्या. फडणवीस सरकारप्रमाणे मदत करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने तोंडे बघून मदत दिली. असंख्य शेतकरी, पूरग्रस्त, व्यावसायिक आजही मदतीपासून वंचित आहेत. त्यावर आधी बोला.’

अधिक वाचा  राज ठाकरेंची अशी तयारी... धमकीला मनसेची केराची टोपली

‘सांगली जिल्ह्यातील गल्लीबोळातून कॅसिनो, क्लब, जुगार अड्डे सुरू आहेत. तरुण देशोधडीला लागले आहेत. तडीपार, बलात्कारी, तस्कर पालकमंत्र्यांच्या ताफ्यात उजळ माथ्याने फिरत आहेत. मिरज दंगलीतील बड्या माशाला निर्दोष करण्यासाठी सरकारने न्यायालयात काय भूमिका घेतली, याचाही खुलासा करावा. महापालकेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर वाटपात हस्तक्षेप सुरू आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यापासून मोनोरेल, जकात तस्कर व बीओटीमधील सोनेरी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे, असे पवार म्हणाले.

घनकचरा प्रकल्पात मोठा डल्ला मारायचे काम सुरू आहे. गावभाग, खणभागात पाणीटंचाई आहे. अन्यत्र सदस्यांचे डोंगर उभे आहेत. सर्वोदय, डफळे कारखान्यांच्या व्यवहारातील पाप झाकून राहिलेले नाही. महांकाली कुणी बंद पडला, साऱ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रापेक्षा शेजारील कर्नाटक व गोव्यामध्ये पेट्रोल व डिझेल दर कमी कसे? यावर जनतेला संवादातून उत्तर द्यावे. अन्यथा आम्ही त्यांच्या भाषेत आणि अधिक सविस्तर उत्तर देऊ, असे आव्हान पवार यांनी राष्ट्रवादीला दिले.