मुंबई : ऐरोली विधानसभेतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जातेय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये गणेश नाईक यांच्या अटकेसंदर्भातील भाष्य केलं आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. गणेश नाईकांवर शनिवारी महिलेला धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात नाईक यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यात आहे.

२४ तासांमध्ये दोन गुन्हे दाखल
सुरुवातीला संबंधित महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांना राज्य महिला आयोगाने निर्देश दिल्यानंतर त्यांच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांतील तक्रारदार महिला एकच आहे. नाईक यांच्याविरोधात महिलेला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून २४ तास उलटत नाहीत तोच त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  ठाकरेंचे दुसरे 'खास' राज्यसभेवर? मातोंडकर अन नार्वेकरांची चर्चा

रुपाली चाकणकर म्हणाल्या अटक होणार
“ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाला ईमेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिलेने प्रत्यक्षात भेट घेऊन घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत आणि तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन. राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करण्याचे निर्देश देऊन ४८ तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले. त्यानुसार १५ तारखेला नवीन मुंबई पोलीस स्थानकामध्ये गणेश नाईक यांच्याविरोधात आयपीसी ५०६ (ब) हा गुन्हा दाखल झालाय. तसेच १६ तारखेला नेरुळ पोलीस स्थानकात आयपीसी ३७६ हा गुन्हा दाखल झालाय. दोन्ही पोलीस स्थानकात दाखल झालेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे असून गणेश नाईक यांना अटक करुन पुढील चौकशी व कारवाई केली जाईल,” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

अधिक वाचा  मांजरी बुद्रुक रेल्वेगेटवर लवकरच भुयारी मार्ग ?

जबरदस्तीने संबंध ठेवले, लैंगिक अत्याचार केले
नाईक यांच्याबरोबर गेल्या २७ वर्षांपासून ‘लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘‘नाईक यांच्यापासून मला एक मुलगा झाला असून तो आता १५ वर्षांचा आहे. हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर त्याला आणि मला अधिकृतपणे स्वीकारण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले होते. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पाळला नाही, माझी फसवणूक केली’’, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. नाईक यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीत महिलेने त्यांच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र नाईक यांनी पीडीत महिलेशी जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केले. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.