नवी दिल्ली –उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा  यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

सर्वोच्च न्यायालयानं लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द केला आहे. यापूर्वी 4 एप्रिल रोजी सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता.

यापूर्वी ते चार महिने कोठडीत होते. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

अधिक वाचा  राज्यात तब्बल ६७४ शाळा अनधिकृत त्यात पुण्यातील २२ शाळांचा समावेश

सुनावणीदरम्यान, शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि प्रशांत भूषण यांनी उच्च न्यायालयानं चौकशी अहवालाकडे दुर्लक्ष केलं आणि आरोपींना दिलासा देण्यासाठी केवळ एफआयआरचा विचार केला, असा आरोप करत जामीन रद्द करण्याची मागणी केली होती.

त्याचवेळी आशिष मिश्रा यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील रणजित कुमार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला होता. परंतु, आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा टेनी यांचा जामीन रद्द केला आहे.