मुंबई – मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ‘तुमचे भोंगे काढा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू’, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा नारा देत जोरदार कार्यक्रमांना सुरूवात केली आहे. पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी अंगावर भगवी शाल ओढत मारूतीची महाआरती केली. मात्र, याच मुद्द्यावरून शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

अंगावरचे कपडे बदलून हिंदुत्त्व येत नाही. त्यासाठी हिंदुत्त्व हे रक्तात असावं लागतं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तर आमच्या मनात आणि रक्तात हिंदुत्त्व आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कपात म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे'; फडणवीसांची टीका

दरम्यान, यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी मनसे आणि राज ठाकरेंवर टीका केली होती. मनसे भाजपची  ‘सी टीम’ आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र डागलं आहे.