पुणे : पालिका निवडणुका जसजशा जवळ येवू लागल्या आहेत, तसतशी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) शनिवारी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी विधानसभानिहाय बैठका घेतल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी बैठका आयोजित केल्या होत्या. त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वेळी आमंत्रित केले आणि त्यांना बूथ समित्या मजबूत करण्यास आणि मतदार यादीचा तपशीलवार अभ्यास करण्यास सांगितले होते. पवार आणि पाटील म्हणाले, की आमच्या बूथ समित्या मजबूत केल्या तर पुणे शहराचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल.

अधिक वाचा  तब्बल 3 कोटी रुपये थकबाकीप्रकरणी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई

‘नागरिक केंद्रित योजना राबवण्यावर भर’

पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, की सर्व सभा बंद दाराआड होत्या, माध्यमांना परवानगी नव्हती. आम्ही क्षेत्रनिहाय समस्या, कमकुवतपणा आणि आमचे मजबूत मुद्दे यावर चर्चा केली. कार्यकर्त्यांना थेट नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, ज्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. पवार म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार विविध निर्णय घेत असून नागरिक केंद्रित योजना राबवत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता सरकारचे ब्रँड अॅम्बेसेडर बनणे आणि मतदारांना माहिती देणे आवश्यक आहे.

अॅपही केले लाँच

राष्ट्रवादीने शनिवारी अॅपही लाँच केले. या अॅपचा मुख्य उद्देश शहरी समस्या आणि लोकांच्या अपेक्षा समजून घेणे हा आहे. एकदा डेटा संकलित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यानुसार धोरणे तयार करणार आहे. एकूणच शहरात राष्ट्रवादीचा महापौर बनविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने कंबर कसली असून कार्यकर्त्यांचा नेत्यांशी थेट संवाद घडवून आणत तयारीला सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाचाही आधार यानिमित्ताने घेण्यात येत आहे.