कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काँग्रेस नेते आणि कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात एकत्रित येत ही निवडणूक लढली होती. निकालाअंती काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने विजय साकार केला. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली.

भाजपला जरी या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला असला तरी पहिल्या टप्प्यात भाजपने कदम यांचे नाव जाहिर करुन आघाडी घेत हवा निर्माण केल्याचे चित्र होते. त्यातच आक्रमक प्रचार यंत्रणा, ३ केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ४० स्टार प्रचारक यामुळे भाजपचे पारडेही जड वाटतं होते. पण अचानक वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु झाली अन् भाजप हळू हळू बॅकफूटवर जावू लागल्याचे दिसून आले.

अधिक वाचा  टेक्सास गोळीबार प्रकरण; प्रियांका चोप्रा शोक व्यक्त करत म्हणाली...

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीलाच कोल्हापुरात तीन लाख कार्यकर्ते प्रचारासाठी येतील, असे जाहीर केले. ते आले नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना त्यावरुन विरोधकांकडून बरेच ट्रोल करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून मतांसाठी मतदारांच्या खात्यात ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करणार असल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. इतकचं नाही तर हे पैसे आल्यास संबंधित मतदारांची ‘ईडी’ चौकशी करू शकते, असे सांगून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी देखील महिलांविषयीचे केलेले वक्तव्य बरेच वादग्रस्त ठरले. त्यालाही विरोधकांकडून मुद्दा बनविण्यात आला.

याशिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेतील दगडफेक व त्यानंतर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर तणाव निर्माण झाला. त्याचा फटका भाजपला बसल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाराज शिवसैनिकांची मते भाजपच्या पारड्यात पडतील, ही अपेक्षा ठेवण्यात आली होती. मात्र तसे झालेले दिसून येत नाही. मातोश्रीवरुन आलेला आदेश शिवसैनिकांनी पाळलेला दिसून येत आहे. कारण शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, छत्रपती शिवाजी चौक, सिद्धार्थनगर, जुना बुधवार, पंचगंगा तालीम, खोलखंडोबा, तोरस्कर चौक या भागांत काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे.