मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर मनसेत नाराजीनाट्य सुरू झाले आहे. तसेच राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच्या ठाणे येथील सभेत भोंगे हटविण्याची अंतिम मुदत दिली आहे.
ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने पक्षात आणखीनच नाराजी वाढली आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक मुस्लीम कार्यकर्ते मनसेला जोडले गेलेले आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर ते पक्षावर नाराज असल्याचे समोर येत आहे.
आता तर थेट मनसे प्रमुख राज ठाकरेंना यांना त्यांच्याच एका माजी मनसैनिकाने आवाहन दिलं आहे. ‘मशिंदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः यावं त्यांचा ताफा मी अडवेन. राज ठाकरे हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांनी स्वतः मैदानात उतरावं,’ असं अजित कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे हे कांही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नंतर काँग्रेस आणि आता भाजपचे बोलके पोपट म्हणून काम करत आहेत, अशी ही टीकाही कुलकर्णी यांनी केली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी मनसेने टोल प्रश्न हाती घेतला होता, त्यावेळी टोल फोडल्यानंतर राज ठाकरेंनी कुलकर्णींचा सत्कार केला होता.
तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, मनसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या सोबतच 35 जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि मराठवाड्यातील 35 मनसे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
‘मी गेल्या अनेक वर्षांपासून मनसेसोबत काम करत आहे. मात्र राज साहेब ठाकरे यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे काम करणं कठीण झाले आहे, राज साहेबांनी बदललेल्या भूमिकेमुळे मला राजीनामा द्यावा लागत आहे, असे फिरोज पी. खान यांनी म्हंटले आहे.
तसेच ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. सचिव इरफान शेख यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला आणखी एक धक्का बसला आहे.