खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू असा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्री बाहेर शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात येते आहे.

सध्या राज्यात हनुमान चालीसा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. अशात आज हनुमान जयंती आहे म्हटल्यावर तर त्या उत्साहाला उधाण आलं आहे. अशात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं आहे. तसंच त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं नाही तर मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळेच मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी झाला आहे.

अधिक वाचा  जपानची संशोधनासाठी शुभमला ‘मेक्स्ट’ शिष्यवृत्ती;

काय म्हणणं आहे शिवसैनिकांचं?

मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे. तिथे येऊन कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते कधीही सहन करणार नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल असं शिवसैनिक म्हणत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मातोश्रीबाहेर जी घोषणाबाजी करण्यात आली त्यातही त्यांचा सहभाग होता.

शुक्रवारी रात्री अमरावतीत शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केलं. शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. अमरावतीत त्यांचं गंगा सावित्री निवासस्थान आहे त्याच ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. यावर टीका करत नवनीत राणा यांनी म्हटलं की, ‘आम्ही दिवसाढवळ्या येऊन दनुमान चालीसा पठ करु, त्याच्यासारखं रात्री काळोखात आंदोलन करणार नाही.’

अधिक वाचा  कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी

नवनीत राणा यांनी हा इशारा दिल्यानंतर मातोश्रीसमोर शिवसैनिकांची फुलऑन गर्दी झाली आहे. शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर केलेल्या गर्दीमुळे वांद्रे कलानगर भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. नवनीत राणांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मशिदींवरच्या भोंग्याचा पुनरूच्चार केला. त्यांनी असं म्हटलं आहे की जर मशिदींवरचे भोंगे सरकारने हटवले नाहीत तर आम्ही हनुमान चालीसा पठण करणार. आज पुण्यातही हनुमान चालीसा पठण केलं जातं आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणीही हनुमान चालीसा पठण केलं जातं आहे. अशात आता शिवसैनिक हे खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले आहेत.