नाशिक ही रामाची भूमि आहे. पवित्र भूमि आहे. काही लोक हनुमान चालीसा पठण करायला पुण्यात पोहचले तर काही मातोश्रीच्या बाहेर पोहचले आहेत. मतोश्रीच्या बाहेर शिवसैनिक जमले आहेत. हनुमान, राम, हिंदुत्व हे तुम्ही कोणाला शिकवत आहात? ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतलं आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. तसंच मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणीही हनुमान चालीसा पठण केलं जातं आहे. या सगळ्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. आजच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल लागला. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचार शिगेला पोहचला होता तेव्हाच काही लोकांनी भोंगे, हनुमान चालीसा यांचं एक घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  चिखलात फिरुन आसामच्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली महिला IAS अधिकारी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अशा प्रकारचे कोणतेही तणावाचे मुद्दे हे निर्माण करण्याचा प्रय़त्न झाला. त्याचा कोणताही फायदा आणि उपयोग कोल्हापुरात झाला नाही. ज्या प्रकारचं राजकारण भाजपकडून केलं जातं आहे. नवहिंदुत्व ओवेसी किंवा एमआयएमकडून करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. कोल्हापूरचा निकाल हे त्याचं प्रमाणपत्र आहे. फार ताकद लावली, आता हिमालयात कोण जातं ते पाहू असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनीही संजय राऊत यांनी टोला लगावला.

१९८७ मध्ये मुंबईत झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ती पोटनिवडणूक जिंकली होती. याची आठवण मला या निमित्ताने झाली. शिवसेना प्रमुखांची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मात्र असे भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही. लोक स्वीकारत नाहीत. त्यामुळे भोंग्याचं राजकारण काय आहे ? आणि भोंगे तुमचे असले तरीही आवाज कुणाचे आहेत? हे कोल्हापूर उत्तरच्या जनतेने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व म्हणून दाखवून दिलं आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  भाजपा मोठा चमत्कारीक पक्ष, कशाचा इव्हेंट करतील याच भरवसा नाही

कोल्हापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव या प्रचंड मतांनी जिंकून येत आहेत. त्यामुळे भोंग्यांचं राजकारण हे आजच संपलं आहे. आज हनुमान जयंती आहे. रामनवमी होऊन गेली. दोन्ही सण वर्षानुवर्षे आपण शांतपणे साजरे करतो. मात्र यावेळी रामनवमीला दहा राज्यांमध्ये दंगली झाल्या. यापूर्वी कधीही रामनवमीला दंगली झाल्या नाहीत. ज्या राज्यांमध्ये भविष्यात विधानसभा निवडणुका आहेत तिथलं सामाजिक ऐक्य बिघडवायचं आणि धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि निवडणुका जिंकायच्या हे रामनवमीच्या निमित्ताने काही लोकांनी घडवलं.

हिजाबचा मुद्दा उत्तर प्रदेश निवडणूक जिंकल्यानंतर संपला. आता हे नवे मुद्दे आले आहेत. हनुमान चालीसा आणि भोंग्याचा मुद्दा आहेत. हनुमान चालीसा पोथ्यांमध्ये बघून वाचताना मी पाहिलं. पोथीत मान खुपसून कार्यकर्ते हनुमान चालीसा म्हणत आहेत. जर खरे भक्त असता तर हनुमान चालीसा पाठ असती. पोथीमध्ये बघून काही म्हटलं म्हणजे हनुमानाचे खरे भक्त आहात हे सिद्ध होत नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.