पुणे : ‘‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जेम्स लेनप्रकरणी आधी निषेध नोंदवावा आणि मग या विषयावर बोलावे. त्यांनी जेम्स लेनचा अद्याप निषेध नोंदविलेला नाही. त्यामुळे त्यांना याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,’’ अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली.

गायकवाड म्हणाले, ‘‘जेम्स लेनच्या ‘शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर होता. सामाजिक भावना दुखावल्यामुळे राज्य सरकारने २००४ मध्ये या पुस्तकावर बंदी घातली. उच्च न्यायालयात पुस्तकावर बंदी कायम राहिली. परंतु, सर्वोच्च न्यायालयात या पुस्तकावरील बंदी उठण्यात आली. उच्च न्यायालयात बंदी असतानाही पुस्तक विक्री सुरू होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही जेम्स लेनचा निषेध केला नाही. मग १८ वर्षांनंतर राज ठाकरे यांनी सभेत हा मुद्दा उकरून काढण्यामागे काय डाव आहे? ’’

अधिक वाचा  पुण्यात दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व जाती-धर्माच्या नेत्यांचा मंत्रिमंडळात स्थान दिले. गेल्या ५० वर्षांत त्यांना कोणी जातीयवादी म्हटले नाही. पवार हे महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे बदनामी करून त्यांची आणि आघाडी सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे. तसेच, मशिदीवरील भोंग्यांना विरोध करून धार्मिक तेढ निर्माण करणे हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

माहिती पुरविणारे दोषी

शरद पवार हे आघाडी सरकारचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी जेम्स लेनला अमेरिकेतून आणून चौकशी करावी, अशी मागणी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केली आहे. या संदर्भात गायकवाड म्हणाले, ‘‘जेम्स लेनपेक्षा त्याला माहिती पुरविणारे दोषी आहेत. त्याला भारतात आणायचे म्हटल्यास आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यर्पण कायदा आहे.’’