मुंबई –राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पुणे पोलीस देखील त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
दोन वर्षांपूर्वी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याशी संबंधितच गुन्हा 2020 मध्ये पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल आहे. सातारचे खा. उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयी वादग्रस्त विधान गुणरत्न सदावर्तेंनी केले होते. दरम्यान, पुण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस करत असून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव आता गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुणे पोलीस देखील सदावर्तेंना ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.