मुंबई – गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मशिदींवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यात आणि अन्य शहरांमध्ये मुस्लिम पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र पाहायला मिळालं.

असं असताना ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करीत भोंगे काढण्यासाठी 3 मे ची डेडलाईन दिल्याने नाराज झालेल्या शेख यांनी पक्षाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. यानंतर आता त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.

“आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’..!” असं म्हणत इरफान शेख यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. “खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो,ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भुमिका घेत असेल आणि स्वतः हा पक्षाध्यक्षच जर भुमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे. ब्लु प्रिंट, विकासाच्या भव्य दिव्य कल्पना एक दिवशी अचानक मस्जिदीवरील भोंगे आणि मदरस्यावर येऊन थांबतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जातं.”

अधिक वाचा  संभाजीराजेंची पुरती कोंडी?; राजेंच्या हाती केवळ काही तासचं?

“पक्ष स्थापन झाला तेंव्हा भूमिका होती की जातीपाती विरहित राजकारण करायचं. म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात आहेत आणि जीवतोड मेहनत देखील करत आहेत. पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता. राज साहेब ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते मात्र पाडव्याच्या सभेत वेगळंच काहीतरी पाहायला आणि ऐकायला भेटलं!म्हणे मदरस्यात छापे मारा पाहा काय काय मिळतं! राज साहेब कित्येक गोरगरिबांच्या मुलांचे मदरस्यात शिक्षण होते. तिथे कधीच काही चुकीचं होत नाही. नसेल तर माझ्यासोबत चला मी दाखवतो मदरसे. मात्र बदनामी का?” अशा सवाल शेख यांनी विचारला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, ट्विट करत दिली माहिती

“मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं. त्यांना मस्जिदच्या भोंग्यापासून त्रास होतो, मदरस्याना बदमान करायचं काम त्यांचं आहे. अशा शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज का पडली? मी ही एक राष्ट्रप्रेमी महाराष्ट्रातील मराठी मुसलमान आहे. एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारखं आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा देत आहे…! असो, राज साहेबांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’!” असं इरफान शेख यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  घोडेगाव शासकीय आश्रमशाळेला ISO मानांकन

“मी पक्ष स्थापनेपासून काम करत आहे. अनेक आंदोलनात सामील होऊन अनेक गुन्हे अंगावर घेतले. 2008 च्या मराठी पाटया आंदोलनात पोलिसांनी अटक केली, अंग हिरवे निळे करेपर्यंत मारहाण केली. त्यावेळी आपणच या जखमा विसरू नको, बाकी मी बघतो असे म्हणाला होतात. आता मात्र काय बघायला मिळत आहे. समाजात कुचंबणा दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण आहे. 16 वर्षानंतर आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्यासोबत असताना तुम्ही आम्हाला या गोष्टी बोलला असतात तर याचा सोक्षमोक्ष केला गेला असता” असे शेख यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान शेख यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील एक अभ्यासु व्यक्तिमत्व गमावल्याची चर्चा आहे.