मुंबई : देशभरात वाढत्या महागाईचा परिणाम आता वही-पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ लागला आहे. पेट्रोल-डिझेल आणि कच्च्या मालाचे दर वाढवल्यानंतर आता वही-पुस्तकांचे दर 35 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय दोन वर्षांनंतर जास्त मागणी असल्याने बाजारात पुस्तकांचा तुटवडा जाणवत आहे.

किंमती 50 टक्क्यांपर्यंत वाढल्या
नवीन शैक्षणिक सत्र एप्रिलपासून सुरू झाले आहे. आता पुस्तके, ड्रेस, बूट आदींच्या किंमतीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पालकांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. याशिवाय शालेय दप्तरांच्या किमतीत 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली आहे. पादत्राणांवर जीएसटी दर 5 वरून 12 टक्के करण्यात आल्यानंतर शालेय चपलांच्या किमती 150 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

अधिक वाचा  अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत सेटवरून रात्री परतताना घडला भयानक प्रकार

कच्चा माल महागला
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वही पुस्तके तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती कोरोनाच्या काळात अधिक वाढल्या आहेत. त्याचबरोबर कागदाचे दर 50 रुपयांवरून 85 रुपये किलो झाला आहे.

पूर्वी जे वही-पुस्तकांचे संच सरासरी तीन हजार रुपयांना मिळायचे, ते यंदा पाच हजार रुपयांना विकले जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच खासगी प्रकाशकांचे गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे जे पुस्तकं 300 ते 325 रुपये किंमतीचे होते ते आता 400 रुपयांवर गेले आहे.

दोन वर्षांनी वही पुस्तकांची मागणी वाढली
कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. 2021 मध्येही शाळा वेळेवर उघडू शकल्या नाहीत. त्यामुळे पुस्तक आणि स्टेशनरी व्यवसायावर परिणाम झाला. शाळा उशिरा सुरू झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला होता. आता 2 वर्षानंतर शाळा आणि शिकवण्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने वही पुस्तकांची मागणी वाढली आहे.