सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे सत्तारूढ पक्षांच्या विरोधात ईडीने कारवाया सुरू केल्या आहेत. यासंदर्भात मागच्याच आठवड्यात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दुसरीकडे राज ठाकरे हे चांगलेच चर्चेत आहेत. कारण त्यांनी गुढी पाडव्याला केलेलं भाषण त्यानंतर घेतलेली उत्तर सभा हे सगळे विषय गाजत आहेत. अशात आता संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर खास शैलीत टीका केली आहे.

जे काम उत्तर प्रदेशात ओवेसींनी केलं तेच काम भाजप राज ठाकरेंकडून महाराष्ट्रात करून घेणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अधिक वाचा  बिहारमध्ये राजकीय खळबळ; ७२ तास आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

शिवसेना खासदार संजय राऊत यांना एक प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही म्हणता की राज ठाकरे यांचं भाषण हे भाजपने प्रायोजित केलं होतं. याचा अर्थ असा घ्यायचा की राज ठाकरे आणि भाजप म्हणजेच मनसे आणि भाजप यांची युती होईल? त्यावर संजय राऊत म्हणाले की भाजपसाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी आहेत. जे काम उत्तर प्रदेशात ओवेसींनी केलं तेच काम महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप करू पाहतं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांचा राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात चांगलाच समाचार घेतला होता. अगदी त्यांची नक्कलही केली होती. एवढंच नाही तर उत्तर सभेतही त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. आता संजय राऊत यांनी जे प्रत्युत्तर दिलं आहे त्याबाबत राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

महाविकास आघाडी किती मजबूत आहे? या प्रश्नाचंही उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. ते म्हणाले, ”महाराष्ट्रात तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहेत. तिन्ही पक्षांची विचारधार वेगवेगळी आहे. मात्र कुणीही कुणाचा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन केलेला नाही. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर सुरू आहे. ज्यामध्ये मूलभूत गरजा, आरोग्य, शिक्षण आणि कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आमचं सरकार मजबूत आहे.”

राज ठाकरे यांनी ठाण्यात जेव्हा उत्तरसभा घेतली तेव्हा त्यातही संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी तेव्हा राज ठाकरेंना भाजपचा भोंगा असं म्हटलं होतं. गुरूवारी तर सामनात भाडोत्री भोंगा असा अग्रलेखही लिहून आला होता. आता आज राज ठाकरेंची तुलना संजय राऊत यांनी ओवेसींशी केली आहे. याबाबत राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.