मुंबई : महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या  आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार आहेत. दुपारी किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होणार आहे. किरीट सोमय्या हे आरोपांचा कुठला बॉम्ब फोडतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतानाच त्यापूर्वी संजय राऊत यांनी एक आरोपांचा बॉम्ब फोडला आहे. किरीट सोमय्यांच्या कुटुंबीयांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा  केला असून लवकरच हा घोटाळा बाहेर काढण्यात येईल असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या

संजय राऊत म्हणाले, पाकिस्तानात दाऊद इब्राहिम बसला आणि तो महाराष्ट्रातील घोटाळे उघडकीस आणू लागला तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? तो गुन्हेगार आहे. दाऊद इब्राहिमने जसं दहशतवादावर बोलू नये तसं आयएनएस विक्रांत सारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर ज्यांनी घोटाळा केला आहे, लोकभावनेशी खेळले आहेत आणि जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झाले आहेत अशांनी दुसऱ्यांच्या संदर्भात खोटे आरोप करणं बरोबर नाही. लोकं विश्वास ठेवणार नाहीत. आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या. विक्रांतचा पैसा कुठे गेला? विक्रांतचा पैसा गोळा गेला त्याचं काय झालं?

अधिक वाचा  संभाजीराजेंचा शिवबंधनास नकार! `प्लॅन बी` मध्ये ही ३ नावे!

शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा

लवकरच या महाशयांचा मी एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर मनपा आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा घोटाळा झालाय. कुठे कुठे पैसे खातायत तर विक्रांत पासून ते टॉयलेट पर्यंत. ही सर्व कागदपत्रे सूपूर्त झाली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही एनजीओ ही लोकं चालवत होती त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा केलाय. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे सर्व घोटाळे… हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा असंही संजय राऊत म्हणाले.

अधिक वाचा  "पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या” मनसेचे शिवसेनेवर टीकास्त्र

या सर्व विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. सर्व भाजपच्या नेत्यांची राष्ट्रीय भक्ती ओसंडून वाहत असते. काल सुद्धा मी पाहिलं त्यांनी पवार साहेबांबत ट्विट केले. एखादं ट्विट त्यानी आयएनएस विक्रांत घोटाळ्यावर करावं. आम्ही आता बाहेर काढणार आहोत तो टॉयलेट घोटाळा त्याबाबतही एखादं ट्विट फडणवीसांनी करावं असंही संजय राऊत म्हणाले.