पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यांविरुद्ध हनुमान चालिसा भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे ही इफ्तार पार्टी हनुमान मंदिरात होणार आहे. उद्या पुण्यात मनसेनेच्या वतीने राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादीने हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने राजकारण तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या इफ्तारचे आयोजन केले आहे. शहरातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज संध्याकाळी सव्वा सहा वाजता ही पार्टी होणार आहे. राष्ट्रवादीकडून आयोजित इफ्तार पार्टीत हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिम बांधव आजचा रोजा सोडणार असल्याचीही माहिती आहे. मशिदींवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच विरोध केला. पण सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने दोन समाजात तेढ नको आणि वातावरण शांत राहावे, अशी राष्ट्रवादीने भूमिका घेतली आहे.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटप गुंता असताना भाजपच्या मात्र सुस्साट 23 जागांचे वाटप शिंदे-अजितदादांच्या पदरी निराशाच?

दरम्यान, राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या पुण्यात हनुमानाची महाआरतीही होणार आहे. यावेळी हनुमान चालीसाचे सामूहिक पठण देखील होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

तर 3 एप्रिलपासून इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिना सुरु झाला. आज रमजानचा तेरावा दिवस आहे. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न-पाणी घेत नाहीत. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आजचा रोजा सोडण्यासाठी पुण्यात इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.