पुणे – ‘देशाचा इतिहास आणि संस्कृतीचा  जीवनमूल्यांशी संबंध आहे. इतिहास आणि धर्म  याचा योग्य अर्थ समजावून सांगण्यात आपण कमी पडलो. सध्या इतिहासाचा जास्त उपयोग हा उखाळ्या-पाखाळ्या काढण्यासाठी होतोय, हे आमचे दुर्भाग्य आहे. इतिहासाचा उपयोग हा देश आणि समाज घडविण्यासाठी झाला पाहिजे. वादविवादातून कोणाचे कल्याण होत नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सध्या इतिहासातील मुद्यांवरून वादविवाद उकरून काढणाऱ्यांचे अप्रत्यक्ष कान टोचले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने फिरोदिया ट्रस्टच्या सहकार्याने उभारलेल्या ॲम्फी थिएटरचे (समवसरण) उद्घाटन गुरुवारी पार पडले. या वेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘कर्मकांड, जातीयवादाच्या संकल्पनेला धर्मात कोठेही आधार नाही. इतिहास, संस्कृती आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धती ही समाजाची मोठी शक्ती आहे. भौतिकवादातून कितीही प्रगती केली, तरी सुख मिळत नाही. पालक आणि शिक्षकांकडून जे संस्कार मिळतात, त्यातून जे माणूसपण येते त्यावर कुटुंबातील सुख अवलंबून असते.’’

अधिक वाचा  केंद्राच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण शहरात ११ हजार ६२३ व्यावसायिक अनधिकृत

भांडारकर प्राच्यविद्येतील साहित्य हे भविष्यातील समाज निर्मितीसाठी उपयोगी ठरणार आहे. संशोधनाचे कार्य हे ‘सेफ डिपॉझिट व्हॉल्ट’मध्ये न ठेवता सामान्यांपर्यंत पोहोचविल्यास अधिक लाभ होइल. प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन व विकास या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे. यासोबतच चांगल्या कामाला लोकाश्रय आणि राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्वस्त सदानंद फडके, सुधीर वैशंपायन, संजय पवार, राहुल सोलापूरकर या वेळी उपस्थित होते.