पुणे : कोथरूड येथील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण, नित्य अभिषेक, चढावे, पूजन, महाभिषेक, भगवान महावीरांचा भव्य पालखी सोहळा, महाआरती, सत्कार समारंभ, वार्षिक अहवाल वाचन, जन्मोस्तव-पाळणा, महाप्रसाद इ. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त मंदिर परिसरात भव्य मंडप उभारून नेत्रदीपक विदयुत रोषणाई करण्यात आली होती.

भगवान महावीर यांचा २६२१ वा जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर यांची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आली होती, यावेळी जय जिनेंद्र, अहिंसा परमो धर्म व नमोकार महामंत्राचा जयघोषात भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. कोथरूड येथील उद्योजक स्व. पोपटलाल मेहता यांच्या स्मरणार्थ वर्धमान प्रेस चे मेहता बंधू आणि परिवार यांना मानाचा भगवान महावीरांचा पालखी सोहळ्याचा मान मिळाला.

अधिक वाचा  २२१ जोडप्यांचे तडजोडीने फुलले संसार; स्वखुशीने १०४ विभक्त कुटुंब

भगवान महावीर यांचा पालखी सोहळा मध्ये युवक-युवतींचा तसेच सर्व वयोगटातील जैन बांधवानी सहभाग घेऊन कोथरूड मध्ये भ. महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील विशेष नैपुण्य, प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रकांतकाका मोकाटे, नगरसेवक पृथ्वीराजदादा सुतार, नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील , नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका वासंती वहिनी जाधव, नगरसेविका हर्षालीताई माथवड, नगरसेविका अल्पना ताई वरपे, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. भगवान महावीर मंडळ व जैन मंदिराचे ट्रस्टी दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, श्रीकांत पाटील, शिरीष बोरगावे, रमेशभाई शहा, उदय लेंगडे, सुनील बिरनाळे, ज्योती बुरसे, शोभा पोकळे, प्रितम मेहता, तात्यासाहेब खोत, अशोक मगधुम तसेच सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित कोथरूड व बावधन परिसरातील जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.