असे म्हणतात प्रेम आंधळे असते, पण आंधळ्या प्रेमातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना वसईतून समोर आली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करुन त्यानंतर स्वत:नेही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

संबंधित घटना वसईच्या कळंब गावात घडली आहे. या गावातील एका लॉजमध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या केली आहे. त्यानंतर त्याने ट्रेन खाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. वसईच्या कळंब इथल्या हार्दिक लॉजमध्ये त्याने प्रेयसीची हत्या केली होती.

अभिषेक शहा असे त्या तरुणाचे नाव होते. तो २१ वर्षांचा होता. बुधवारी दुपारच्या सुमारास तरुण-तरुणी हार्दिक लॉजमध्ये आले होते. त्यानंतर काही वेळाने तरुण जेवण आणण्यासाठी लॉजमधून बाहेर गेला होता, पण तो परतलाच नाही. त्यामुळे लॉज चालक खोलीत गेला तेव्हा त्याला धक्काच बसला.

अधिक वाचा  सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो, पोस्ट, पुण्यात ४ महिन्यांत दीड हजार तक्रारी दाखल

लॉज चालकाने बघितले तरुणी मृतावस्थेत पडलेली होती. त्यानंतर लॉज मालकाने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस लगेच घटनास्थळी उपस्थित झाले. तसेच माहिती मिळाल्यानंतर काही पोलिस कर्मचारी तरुणाचा शोध घेऊ लागले. पण त्या तरुणानेही रेल्वेच्या खाली उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले.

ज्या मुलीची हत्या करण्यात आली ती अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लॉजमध्ये तिला प्रवेश कसा दिला गेला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र या घटनेमुळे कळंबच्या लॉजिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केलं जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता लॉजमध्ये अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये प्रवेश दिल्याने लॉज मालकावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  २१ जिल्ह्यांत निवडणुकांवर पावसाचे सावट! सरासरीपेक्षा अधिक पाऊस

गेल्या दोन महिन्यात वसईमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वसईतील स्टेटस लॉजमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. तिथेही एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली होती. त्यानंतर तो उत्तर प्रदेशला गेला होता. तिथे जाऊन त्यानेही आत्महत्या केली होती.