सातारा : साताऱ्यातून भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याबाबत एक धक्क्दायक बातमी समोर आली आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात फसवणूक, अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्याच्या दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पाच सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे. पोलीस या प्रकरणी गोरेंना अटक करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह 5 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीला जीवंत दाखवत जमिनीचा दस्तऐवज केल्याचा आरोप गोरेंवर आहे. या प्रकरणी साताऱ्यातील दहिवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

जयकुमार गोरे यांच्यावर नेमका आरोप काय?

महादेव पिराजी भिसे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक शेतकरी, जो मयत आहे, त्याला जीवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज केला गेला. त्यातून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केली गेली, असा आरोप जयकुमार गोरेंवर आहे.

जयकुमार गोरे यांच्याविषयी माहिती

जयकुमार गोरे हे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. ते 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांची चांगली पकड आहे. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजपने त्यावेळी हा मतदारसंघ जयकुमार गोरे यांच्यासाठी मागितला होता. तर शेखर गोरे यांना शिवसेना तिकीट देण्यास तयार होती. शेखर यांना शिवसेनाचा पाठिंबा होता. त्यामुळे दोन भावांमधील निवडणुकीची लढत चांगलीच रंगतदार बघायला मिळाली होती. या रंगतमुळे राज्यभरात गोरे बंधुंची चर्चा झाली होती. जयकुमार गोरे हे 2009 साली अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 2014 साली ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता