मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर या दोन अधिकाऱ्यांची बदली गुवाहाटीला करण्यात आली. या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन आर्यन खान प्रकरणामुळे करण्यात आले नसल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांचे नाव विश्व विजय सिंह आणि आशिष रंजन प्रसाद असे आहे. विश्व विजय सिंह यांची बदली गुवाहाटी येथे करण्यात आली होती. आता त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याशिवाय दुसरे अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांची बदली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) करण्यात आली. आता त्यांचेही निलंबन करण्यात आले.

अधिक वाचा  दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती, नाहीतर...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, DDG ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालाच्या आधारे दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे. हे दोन्ही आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अधिकारी होते. मात्र, त्यांचे निलंबन इतर प्रकरणात करण्यात आले आहे.

प्रकरण काय आहे?

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि या तपासाचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडेंविरोधात जोरदार आरोपांची मोहीम सुरू केली होती. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचेही गंभीर आरोपही झाले. या प्रकरणावरून एकूणच एनसीबीच्या कार्यपद्धतीवरही अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. त्यामुळे नाईलाजानं या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्लीतील विशेष तपास पथकाकडे हस्तांतरित करण्यात आला.