मुंबई : लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघेंचे अनेक किस्से आहेत. त्या किस्स्यांची अनेकदा चर्चाही होत असते. पण आता त्यांच्या जीवनप्रवासावर चित्रपट येणार आहे. धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलिज झाला आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच आनंद दिघेंची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण आता आनंद दिघेंची भूमिका कोणता अभिनेता साकारणार आहे हेही समोर आले असून त्याचा पहिला लूकही समोर आला आहे. या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक साकारणार आहे. तर प्रवीण तरडेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे.

अधिक वाचा  लाल महालातील लावणी महागात; वैष्णवी पाटील वर गुन्हा दाखल

हा चित्रपटात दमदार डायलॉग लिहिण्यात आलेले आहे. यावेळी टीझरमध्ये प्रवीण तरडेंचा व्हॉईस ओव्हर ऐकायला मिळत आहे. कुठल्याही बँकेचं साधं अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला, जगातला सर्वात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिलाय, अशा शब्दांत आनंद दिघेंची ओळख करुन देण्यात आली आहे.

हा चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ठाण्याचा वाघ म्हणून ओळख असणाऱ्या आनंद दिघेंवर चित्रपट येणार असल्याने सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणाऱ्या प्रसाद ओक यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तळागाळातील लोकांचा विचार करणं हे आनंद दिघेंचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्यं होतं. गरीबांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवणारं आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर जरब बसवणारं हे व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून माणसं जोडली. या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांचा हा जीवनप्रवास जगता आला. त्यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे, असे प्रसाद ओकने म्हटले आहे.

अधिक वाचा  टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार; 21 मृत्युमुखी

दरम्यान, आनंद दिघे हे राज्यातील खुप महत्वाचे नेते होते. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवण्याचे काम आनंद दिघे करायचे. आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्व सामान्यांच्या मनात ते आजही हयात आहे.