मुंबई  : गुढीपाडव्याच्या मुंबईतील सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मनसेने ठाण्यात उत्तरसभा आयोजित केली. ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशात आता मुबंईत राज ठाकरेंविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत.

राज ठाकरे सातत्याने आपली भूमिका बदलतात आणि कधीही आपल्या भूमिकेवर ठाम नसतात, अशा आशयाचे हे बॅनर आहेत. शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांच्याविरोधात हे पोस्टर लावण्यात आले आहे. पोस्टरवर तीन फोटोंची जागा आहे. मात्र, यातील एक जागा रिकामी ठेवून, राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असेल? याबाबत प्रश्न उपस्थित केला गेला आहे.

अधिक वाचा  नागपूरमध्ये शिवसेनेला भीती राजकीय ‘गेम’ होण्याची

पोस्टरमध्ये दिसतं की राज ठाकरे यांनी आपल्या सभेत केलेल्या हनुमान चालीसेबद्दलच्या विधानावरुन त्यांना टोला लगावण्यात आला आहे. या पोस्टरमधील पहिला फोटो जुना असून यात राज ठाकरे मुस्लीम वेशभूषेत पाहायला मिळतात. ‘काल’ असं या फोटोच्या वरती लिहिलेलं आहे. दुसऱ्या फोटोवर आज असं लिहित हनुमान असा उल्लेख त्यावर करण्यात आलं आहे. तर, तिसऱ्या ठिकाणी जागा रिकामी सोडण्यात आली असून त्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि यावर उद्या असं लिहिलं आहे. एकंदरीतच राज ठाकरे सातत्याने आपली भूमिका बदलत राहातात आणि उद्या आता ते कोणती नवी भूमिका घेणार, असा सवाल या माध्यमातून करण्यात आला आहे.

अधिक वाचा  पवारांचं पुण्यात नवं समीकरण? ब्राह्मण समाजासोबत बैठकीतून हे साध्य होणार?

काय म्हणाले होते राज ठाकरे –

‘मशिदीवरील भोंग्यांचा त्रास अख्ख्या देशाला होत आहे. यात धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काय नमाज पडायचा आहे किंवा जी काय अजान द्यायची आहे ती घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते का अडवता? प्रार्थना तुमची आहे तर आम्हाला का ऐकवता. जर सांगून तुम्हाला समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार’ राज ठाकरे म्हणाले होते.