उंड्री: कात्रज बायपास रस्त्यावर उंड्री ते हांडेवाडी चौक दरम्यानच्या डोंगरावर विद्युत खांबामुळे अरुंद रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. महापालिकेच्या रस्ते विभागाने रस्तारुंदीकरणाला अडथळा ठरणारे विद्युत खांब तातडीने हटवावे, रस्ता रुंद करून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.

स्कूल बसचालक शंकर मिसेकर म्हणाले की, उंड्रीमध्ये एक किलोमीटर परिघामध्ये सुमारे दहा खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्यामुळे पीएमबी बसेससह खासगी वाहने आणि स्कूल बसेसची वर्दळ वाढली आहे. कात्रज बायपास मंतरवाडी ते खडीमशीन चौक दरम्यानच्या रस्त्यावर डोंगरावर विद्युत खांब असल्यामुळे रस्ते विभागाने रस्ता रुंद न करता तसाच सोडून दिला आहे. त्यामुळे येथून एका वेळी एकच वाहन जाते, मोठे वाहन असेल तर वाहन चालविताना कसरत करावी लागते. अनेक विद्युत खांब वाहनचालकांसाठी धोकादायक आहेत. गावच्या ठिकाणच्या ओढ्यावर चढ-उतार आणि एकदम वळण अशी स्थिती रस्त्याची आहे. त्यामुळे डोळ्यात तेल घालून वाहन चालवावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.डोळ्यासमोर दिसतो मृत्यू  असे टेम्पोचालक सचिन कदम यांनी सांगितले.

अधिक वाचा  आमच्यासाठी 'पिपल्स फस्ट', पेट्रोल-डिझेल दर कपातीवर PM मोदींचं ट्वीट

रात्री-अपरात्री समोरून येणाऱ्या वाहनांचे प्रखर प्रकाश दिव्यांमुळे डोळे दीपतात आणि वाहन डोंगराला नाही तर दुभाजकाला घासून अपघात होऊन वाहनाचे नुकसान होते. रस्ता रुंदीकरण रखडल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालवताना मृत्यू डोळ्यासमोर दिसतो, असे टेम्पोचालक सचिन कदम यांनी सांगितले.रस्ता रुंदीकरण विद्युत विभागाच्या हटवादीपणामुळे रखडले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा केला, रस्ता रोको केले, आंदोलने केल्यानंतर रस्ता झाला. विद्युत विभागाकडे वारंवार नोटीस देऊनही अद्याप त्यावर कार्यवाही केली गेली नाही.

दरम्यान, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.