पुणे – तळलेल्या खाद्यतेलाचा फेरवापर कराल तर सावधान, अशा व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने कळवले आहे.अन्नसुरक्षा मानद कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्‍त शिवाजी देसाई यांनी कळवले आहे.

विविध नियम आणि आदेशात नमूद केल्याप्रमाणे तळलेल्या खाद्यतेलाचा फेरवापर टाळणे आवश्‍यक आहे. त्याचा शक्‍यतो तळण्यासाठी एकदाच वापर करावा. तळलेल्या खाद्यतेलाचा फेरवापर करताना “ट्रान्सफॅट’ तयार होणे टाळण्यासाठी जास्तीत जास्त तीनवेळा वापर करावा. न वापरलेल्या तेलामध्ये 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त टोटल पोलर कंपाऊंड्‌स (टीपीसी) आढळता कामा नये. 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त टीपीसी आढळून आल्यास त्याचा फेरवापर करू नये.

अधिक वाचा  OBC प्रश्नी समर्पित आयोगाचा राज्य दौरा जाहीर ; अहवाल 'जून' ला शक्य

50 लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी खाद्यतेलाच्या फेरवापराबाबतचा अभिलेखा जतन करावा. तसेच उपयोगात आलेले खाद्यतेल अन्न सुरक्षा आणि मानदे प्राधिकरण नवी दिल्ली या मान्यता प्राप्त संस्थेकडे देण्यात यावे, त्याबाबतचा अभिलेखा जतन करावा अशी तरतूद आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्नसुरक्षा मानदे कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

नियमांचे उल्लंघन करू नका…
उपयोगात आलेले खाद्यतेल जमा करणाऱ्या मान्यता प्राप्त संस्था किंवा प्रतिनिधींनी हे तेल बायोडीझेल, साबण, वंगण आदींचे उत्पादन करण्यासाठी वापरावे. कोणत्याही परिस्थितीत याचा वापर खाद्यपदार्थ निर्मिती किंवा भेसळीसाठी करू नये. तसेच याबाबतचा आवश्‍यक तो अभिलेखा त्यांनी जतन करावा. याप्रकरणी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.