पुणे – सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन खून करण्यात आला. त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काळेपडळ-हडपसर येथे मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी टोळक्‍याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी उर्फ गणेश महेंद्र हिवाळे (24, रा. काळेपडळ) असे मृताचे नाव आहे. तर परवेज उर्फ सोहेल हैदरअली इनामदार ( 20, रा.तिरंगा चौक, हडपसर) हा जखमी झाला. याप्रकरणी सनीच्या आईने तक्रार दिली आहे. सचिन नवले, आकाश कसबे, राहुल कोळी, आकाश काकडे, गोट्या लोहार, संकेत पांडवे, आकाश कोटावळे (सर्व रा. काळेपडळ) यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सनीवर यापूर्वीच डझनभर गुन्हे दाखल होते. तो एका गुन्ह्यातून नुकताच कारागृहाबाहेर आला होता. त्याने काही दिवसांपूर्वीच राहुल कोळी व सचिन नवले यांना मारहाण केली होती. यातूनच हा खुनी हल्ला करण्यात आला.

अधिक वाचा  ...तर हात तोडून हातात देईन, सुप्रिया सुळे भडकल्या

दरम्यान, घटना कळताच उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक साळगावकर आदी दाखल झाले होते. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सनी विरुध्द एक खूनाचा, चार खूनाच्या प्रयत्नाचा, आर्म ऍक्‍ट आदी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर फेब्रुवारी 2021 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो 9 एप्रिल 2022 रोजी कारागृहातून सुटला होता.

तसेच सनी व सोहेल हे दोघेही कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना भेटायला त्यांची मित्र मंडळी काळेपडळ येथील म्हसोबा मंदिर चौकात येत होती. यामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या राहुल कोळी व आकाश काकडे यांचा त्यांच्यावर रोष होता. त्यांनी सनी व सोहेल यास काळेपडळचे भाई होताय का? तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान मंगळवारी सनी व सोहेल दोघे चौकात बसले असताना आरोपी त्यांच्या साथीदारांना घेऊन तेथे आले. त्यांनी कोयता, पालघण आणि लाकडी दांडक्‍याने मारहाण करत दोघांना गंभीर जखमी केले. यामध्ये सनीचा जागेवरच मृत्यू झाला.