समीर वानखेडे यांच्या गच्छंतीनंतर मुंबई एनसीबीची धुरा कुणाच्या खांद्यावर जाणार याची चर्चा होती. अखेर एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी (NCB Zonal Director) नवी नियुक्ती झाली आहे. 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित घावटे एनसीबीच्या मुंबई विभागाचे नवे संचालक असणार आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून मुंबई एनसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचं घावटे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

एनसीबीच्या केंद्रीय कार्यालयातून एक पत्रक जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. तीन अधिकाऱ्यांच्या निवडीचं हे पत्र आहे. यात अमित घावटे यांची झोनल डायरेक्टर बंगळुरु आणि चेन्नईमधून मुंबई झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे बंगळुरु झोनल युनिटचा अतिरिक्त कार्यभार देखील असणार आहे. घावटे यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही या पत्रात उल्लेख आहे. यामध्ये अमनजितसिंह यांची चंदीगढ एनसीबी झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे तर ग्यानेंद्रकुमार सिंह यांची झोनल डायरेक्टर दिल्ली इथं नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  नागपूरमध्ये शिवसेनेला भीती राजकीय ‘गेम’ होण्याची

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित NCBचे दोन अधिकारी निलंबित

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित NCBच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर या दोन अधिकाऱ्यांची बदली गुवाहाटीला करण्यात आली. या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन आर्यन खान प्रकरणामुळे करण्यात आले नसल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.