फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड यांसारखे एकशे बढकर एक चित्रपटांची मेजवानी दिल्यानंतर आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवप्रेमींसह सर्वच स्तरातील प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड आतुरता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहुनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यागाथांची ‘शिवराज अष्टक’ यातुनआठ चित्रपटांची सिरीज दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेते चिन्मय मांडलेकर घेऊन येत आहेत. त्यातील शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हा चित्रपट चौथं पुष्प आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा केलेला वध आणि यासह इतर अनेक प्रसंगांचा शिवप्रेमींना अभिमान वाटावा आणि त्यातुन अनेक गोष्टींची माहिती मिळावी, दैनंदिन जीवनात प्रेरणा मिळावी अशा पद्धतीचे अनेक प्रसंग या चित्रपटातुन पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा येत्या २२ एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा ट्रेलर काही क्षण अंगाचा थरकापही उडवताे. ट्रेलरची सुरुवात होते माँसाहेब जिजाऊंच्या “या पुण्यभूमीवर सध्या हजारो हिरण्यकश्यपू धुडगूस घालतायत.” या वाक्याने त्यापाठोपाठ; “अफजल खान की दहशत ही अफजल खान की ताकद है” असं म्हणत अफजल खानची एन्ट्री होते. या दरम्यानचं अफजल खानने केलेल्या अत्याचाराची झलक पाहायला मिळते.
“आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असणारा आपला हा भगवा त्या आदिलशाहीच्या छाताडात नेऊन गाडायचा.” अश्या गर्जनेत छत्रपती शिवाजी महाराजांची धडाकेबाज एंन्ट्री त्यानंतर होते. यानंतर अफजल खानाने रचलेली क्षडयंत्र आणि त्यावर छत्रपती शिवाजी महारांनी दिलेली योग्य उत्तरं यांची अफलातुन झलक या ट्रेलरमध्ये दिसुन येते.
ट्रेलर पाहताना काही ठिकाणी तर अगदी अंगावर काटा येतो. तर काहीदा थोड्याफार विनोदी शेैलीतील काहींच्या भुमिकेमुळे चित्रपट पाहण्याची उत्कंठाही शिगेला पोहचते. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या भुमिकांना न्याय मिळऊन दिला आहे. त्यामुळे सगळं काही ‘याची देहा; याची डोळा’ आपण अनुभवत असल्याचाच काही क्षण भास होतो.
‘शेर शिवराज’ हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला असुन या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची मुख्य भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी साकारली आहे. तर बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी यांनी अफझलखानाची भूमिका साकारली आहे. वर्षा उसगावकर या बडी बेगमच्या भुमिकेत दिसणार आहेत.