नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुका होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने हिमाचल प्रदेश, व गुजरात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याच मालिकेत आगामी काळात मोदी मंत्रिमंडळातही फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन राज्यांबरोबरच भाजपला सलग दुसऱयांदा साथ देणारा व लोकसभेची चावी मानला जाणारा उत्तर प्रदेश, आगामी मुंबई महापालिका निवडणुका व राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्याची दिल्लीची महत्वाकांक्षा पहाता या संभाव्य विस्तारात मुंबई-महाराष्ट्रालाही महत्वाचे स्थान मिळण्याचे संकेत आहेत. टीम मोदीमधील काही मंत्र्यांना घरी बसावे लागण्याची चिन्हे आहेत.

अधिक वाचा  समाविष्ट गावांना मिळकतकर सवलत नाहीच; विधी चा अभिप्राय घेऊन निर्णय - आयुक्त

राजकीय वर्तुळातील हालचाली पहाता गुजरात, हिमाचल प्रदेश बरोबरच काही मराठी नावेही ‘टीम मोदी‘बरोबर जोडली जाण्याची चिन्हे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई भागातील एक खासदार, भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य विनोद तावडे व राज्यातील एका अल्पसंख्यांक नेत्याची वर्णी टीम मोदीमध्ये लागण्याची शक्यता आहे. तावडे यांची दिल्लीत बदली केली तरी त्यांनी हरियाणाची जबाबदारी तेवढ्याच निष्ठेने सांभाळली हा त्यांचा ‘प्लस पॉईंट’ ठरू शकतो. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात तावडे यांना जे कार्यालय देण्यात आले आहे ते पाहिले तरी राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या वाढणाऱया, विस्तारणाऱया जबाबदाऱयांची जाणीव होते. रहाटकर याचं स्थान केंद्रीय निवडणूक समिती या भाजपमधील क्र.२ च्या महत्वाच्या मंडळात अबाधित आहे.

अधिक वाचा  महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख ठरली; OBC आरक्षणाशिवाय सोडती होणारं

पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या प्रशासनिक फेरबदलांची प्रक्रिया अलीकडेच पूर्ण केली. त्याबरोबरच केंद्रीय मंत्र्यांच्या तसेच मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन देखील पंतप्रधान कार्यालयाकडून सुरू आहे. मोदी शासनातील गेल्या ८ वर्षांतील निवडक मंत्रिमंडळ फेरबदलांकडे नजर टाकली तर ज्या राज्यांत निवडणुका असतात तेथील ‘कामसू‘ खासदारांना मोदी-शहा मंत्रिमंडळात गदी आवर्जून स्थान देतात. ज्यांच्याकडून जबाबदारया काढून घेतल्यावरही नवीन कामात ज्यांनी स्वतःला झोकून दिले अशा नेत्यांना शहा यांच्या दरबारात मानाची वागणूक मिळते. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील संभाव्य नावांकडे पहावे लागेल. त्याचबरोबर कामगिरीत कमी आढळलेल्या व आरोप झालेल्या मंत्र्यांना नारळ देण्यास सत्तारूढ नेतृत्व बिलकूल मागेपुढे पहात नाही. गुजरातची निवडणूक तोंडावर आली आहे.

अधिक वाचा  खाद्यतेलानंतर आता साखर होणार स्वस्त! .. कारखान्यांना बसणार फटका

यंदा तेथे भाजपला अनुकूल वारे वहात असले तरी स्वराज्याबाबत भाजप नेतृत्व यत्किंचितही धोका पत्करणार नाही. त्यामुळेच देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदी, म्हणजे राष्ट्रपतीपदी यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. देशाच्या चारपैकी दोन सर्वोच्च पदांवर गुजराती नेते असल्याचा व गुजराती अस्मितेवर फुंकर घालणारा प्रचार भाजपच्या आणखी पथ्यावर पडणार हे उघड आहे. त्याचबरोबर आगामी संभाव्य विस्तारात काही ज्येष्ठ मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे.