चीन : चीनमधून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मागील दोन वर्षातील कोरोनाच्या रुग्णसंख्येपेक्षा सर्वात जास्त रुग्णसंख्येची नोंद आता तिथे करण्यात आली आहे. चीनमध्ये तब्बल 27 हजार 920 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून ही रुग्णसंख्या सर्वात जास्त आहे, असे सांगितले गेले आहे.

चीनमधील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक अनियंत्रित होत आहे. लॉकडाऊन आणि मास टेस्टिंग असूनही चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. शांघाय या चीनमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या व्यापारी शहरामध्ये परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. तेथे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने दररोज 20 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. आता, चीनमध्ये तब्बल 27 हजार 920 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली.

अधिक वाचा  ठाकरेंनी 'ते' आव्हान स्विकारलं?; पुण्यात येऊन रणशिंग फुंकणार

बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, लक्षणांशिवाय 21,784 बाधित रुग्णांची नोंद झाली. तर एकट्या शांघायमध्ये 19,660 कोरोना रुग्ण सापडले होते. शांघायमध्ये  ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यावरून ते चीनचे कोरोनाचे केंद्र असल्याचे मानले जात आहे. कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, परंतु ओमिक्रॉन प्रकारामुळे रुग्ण सापडण्याचा वेग कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे.

शांघायमधील रुग्णालयांमध्ये एक हजाराहून अधिक लष्करी डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, यावरून बिघडलेल्या परिस्थितीचा अंदाज लावता येतो. 2019 मध्ये वुहानसाठीही लागू केलेली रणनीती येथेही वापरली जात आहे. परंतु आतापर्यंत ही रणनीती प्रभावी ठरत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 1 मार्चपासून शांघायमध्ये कोरोनाचे एकूण 114,000 रुग्ण आढळले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आतापर्यंत चीन सरकारकडून शांघायमध्ये तीन वेळा सामूहिक चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

अधिक वाचा  पुण्यात धक्कादायक प्रकरण उघडकीस,संशयित दहशतवाद्याला अटक

दरम्यान, शांघायमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अन्न पुरवठ्यावर वाईट परिणाम झाला आहे. लोकांना भाजी, मांस, तांदूळ यांसारख्या अन्नपदार्थांसाठीही ओढाताण करावी लागत आहे. सरकार केवळ पोकळ आश्वासने देत आहे, मात्र ग्रांऊड लेवलवर कोणीही मदत करत नसल्याचा आरोप होत आहे. या सगळ्यावर, चिनी सरकारच्या वतीने कठोरतेच्या नावाखाली कोरोना पॉझिटिव्ह मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर ठेवलं जात आहे. बाधित लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलं जात असल्याचेही वृत्त आहे.