ठाण्यात पार पडलेल्या ‘उत्तर’ सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवर टीका केली होती. “राज ठाकरेंना आत्ताच भोंगे दिसले का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यावरून राज ठाकरेंनी निशाणा साधला.

अजित पवारांच्या त्या टीकेवर आज राज ठाकरेंनी भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, अजित पवार, मी कधी कुठली गोष्ट बोललोय, हे मला नीट आठवतंय,तुमच्या माहितीसाठी फक्त ३ व्हिडीओ आणले आहेत,मी याआधीही बोललो होतो,पण त्याचे मला काही व्हिडीओ सापडले नाहीत, असे म्हणत राज यांनी थेट पुरावेच सादर केले.

अधिक वाचा  सलमानने कंगनाला संजय लीला भन्साळींकडे पाठवले तेव्हा ते म्हणाले, "तु तर..."

तसेच पुढे बोलताना अजित पवारांना टोला देखील लगावला. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही, त्यानंतर त्यांना कूSSS असा आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही.’

यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया आली आहे. सकाळी अजित पवार धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या आरोपांसंबंधी विचारले असता अजितदादांनी त्यावर भाष्य केले.

अधिक वाचा  पुणे बेकायदा किडनी प्रत्यारोपण,आणखी 3 हॉस्पिटलची नावं समोर

‘योग्य वेळी उत्तर देईन, त्याची काळजी करु नका, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे,’ असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. तसेच ‘राज ठाकरेंकडे फार महत्व देऊ नका, माझ्या दृष्टीने धनंजय मुंडेंची प्रकृती जास्त महत्वाची आहे, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील सडकून टीका केली. ‘सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. अजित पवार यांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी पडत नाही, याचं कारण मला कळेल का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  ज्ञानवापीवर कंगना राणौत म्हणाली- 'काशीमध्ये कणा कणात महादेव'