मुंबई : मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान अल्टिमेटम राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टिमेटम देण्याची हिंमत या देशात आणि महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे.

“बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिका मांडली होती. पण हा भाजपाचा भोंगा आहे. ईडीची कारवाई झाली त्याबद्दल भाजपाने सूट दिली असून त्यानंतर हा भोंगा सुरु झाला आहे. दीड वर्ष हा भोंगा बंद होता,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

अधिक वाचा  टेक्सास गोळीबार प्रकरण; प्रियांका चोप्रा शोक व्यक्त करत म्हणाली...

“हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही, ते आमच्या रक्तात आहे. जेव्हा हिंदुत्वावर हल्ला झाला आहे तेव्हा भाजपा आणि त्यांचे भोंगे समोर नव्हते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना हिंदुत्वासाठी लढली आहे. कालची गोष्ट सोडून द्या, रात गई बात गई…दिवा विझताना मोठा होतो आणि तसंच झालं आहे,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“काही गोष्टींकडे राजकारणात दुर्लक्ष केलं पाहिजे. हा भाजपाचा भोंगा असल्याचं सर्वांना माहिती आहे. जे महाविकास आघाडीसोबत थेट लढू शकत नाहीत ते असे भोंगे लावून माहौल तयार करत आहेत. अशा लोकांना आमच्याविरोधात बोलण्यास लावलं जात असून राजकीय पोळ्या भाजत असतात,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

अधिक वाचा  पुणे लाल महाल लावणी प्रकरण अंगाशी, नृत्यांगना वैष्णवी पाटील विरोधात गुन्हा

“अल्टिमेटम राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टिमेटम देण्याची हिंमत या देशात आणि महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. बाळासाहेबांनी दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिला होता. अमरनाथ, वैष्णेदेवी यात्रा असो किंवा दहशतवादी कारवाया…अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत राजकारणात, देशात फक्त बाळासाहेबांमध्ये होती,” असं यावेळी संजय राऊत म्हणाले.

“ईडीच्या कारवाईबाबत केंद्राकडून अभय मिळाल्याने हा भोंगा वाजू लागला आहे. खोट्या कारवायंविरोधात आम्ही लढत आहोत, आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, खोटं बोला पण शिवसेना, महाविकास आघाडी भक्कम आहे,” असं राऊत म्हणाले,. तसंच एका वैफल्यातून, निराशेतून असे भोंगे वाजत आहेत असंही ते म्हणाले. भाजपाने आमच्याविरोघात भोंगे वाजवले त्याचा फायदा झाला नाही म्हणून नवीन भोंगे लावलेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

अधिक वाचा  योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम...अभिनेता सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत