मुंबई बुधवारी सोमय्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, मात्र काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील नेत्यांनी सोमय्यांवर केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या आऊट ऑफ रीच आहेत. अटक झाल्यास किरीट सोमय्या यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्यात येईल. तर 18 एप्रिलपासून चार दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, या शर्ती ठेवण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

याआधी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमय्या यांच्या घरावर धडक देत त्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. यापूर्वीही सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते दोघेही हजर झाले नव्हते. दुसऱ्या नोटिसीनंतरही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत, तर त्यांना फरार घोषित केले जाईल, असं पोलिसांनी सांगितलं होतं. मंगळवारीच पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे धक्का बसलेल्या किरीट सोमय्यांना तूर्तास उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा  श्रीगोंद्यात 'नंबर -वन' साठी कुरघोडी; ३ या घराण्यांमध्ये जुंपण्याची शक्यता

‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा फंड जमा करुन घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या परागंदा झाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सोमय्या यांच्या घरी जाऊन राहत्या घराच्या दरवाजावर नोटीस चिटकवली होती. या नोटीशीमध्ये आज सकाळी अकरापर्यंत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.