मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर म्हणून ठाण्यात उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांची नक्कलही केली. राज ठाकरेंच्या उत्तर सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावरचे जॉनी लिव्हर असल्याची टीका त्यांनी केलीय.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यानंतर आठवड्याभरातच राज ठाकरेंनी उत्तर सभा घेतली. यावरून निशाणा साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “तुम्हाला चार दिवसात उत्तर सभा का घ्यावी वाटली? तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता, समाजात तुमच्या पक्षाबद्दल असलेली अस्वस्थता. यामुळेच तुम्ही सभा घेतलीत. सभेत तुम्ही माझी नक्कल करू शकला नाहीत. तुम्हाला जॉनी लिव्हर ही पदवी आता महाराष्ट्र देईल.”

अधिक वाचा  अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’चे नाव बदलले ,करणी सेनेच्या तक्रारीनंतर निर्णय

महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिसत नाहीत. तुम्हाला पेट्रोल डिझेलचे भाव दिसत नाहीत, भाजीपाल्याचे दर दिसत नाहीत, यावर काही बोलणार नाही. एवढं भोंग्याबद्दल प्रेम आहे तर कालची सभा का घेतलीत? सभा घेतली त्या ठिकाणी सेंट जॉर्ज शाळा, शिवसमर्थ विद्यालय आहे. सुप्रीम कोर्ट सांगतं की १०० मीटरच्या आजुबाजुला स्पीकर लावू नये. मग हे कार्यकर्त्यांना माहिती नव्हतं. कार्यकर्त्यांनी का आग्रह धरला. कायद्याप्रमाणे भोंगे काढा म्हणता मग कालच्या सभेबद्दल माफी मागा असेही आव्हाड म्हणाले.

शरद पवार शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, मात्र शिवाजी महाराजांचे नाव त्यांच्या भाषणात कधीच नसतं असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. या आरोपाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “शिवरायांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली, त्यांनी पहिल्यांदा शिवजंयती साजरी केली. शाहू महाराज तर शिवरायांचे वारसदार आहेत. आंबेडकरांनी हे दोघेही आदर्श आहेत असं म्हणत संविधान लिहिलं. त्यामुळे या तिघांचं नाव घेणं म्हणजे शिवरायांच्या विचारांचं नाव घेणं.”

अधिक वाचा  विधान परिषद 10 जागांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर; कुणाला मिळणार संधी?

“राजसाहेब तुम्ही शिव्या घालू शकता, आम्हालाही येतात, पण आमच्या संस्कारात बसत नाही. साधारण व्यंग काढू नये म्हणतात, तुम्ही भाषण करता ते तुम्हाला लखलाभ असो. मात्र संत तुकारामांनी सांगितलंय की उत्तर जशास तसं द्यायचं. तुम्ही जरा नीट बघा तुमच्या भाषणावर कौतुकापेक्षा स्मायली जास्त आहेत. समाजात नवा जॉनी लिव्हर सापडलाय,” अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.