पुणे : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने आपल्या छोट्या मुलींसमोर पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील मेदनकरवाडी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी सचिन काळेल (वय २५, सध्या रा. मेदनकरवाडी, बापदेव वस्ती, चाकण, मूळ रा. ता.माण, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सचिन रंगनाथ काळेल (वय ३०, सध्या रा. मेदनकरवाडी, बापदेव वस्ती, चाकण, ता खेड, जि. पुणे, मूळ रा. सातारा) आरोपी पतीचे नाव असून तो फरार झाला आहे. या प्रकरणी हनुमंत भिकाजी मेदनकर (वय ५३,रा.मेदनकरवाडी ) यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  तारक मेहता...' चाहत्यांना धक्का! शैलेश लोढा नंतर 'बबिता जी' शो सोडणार?

चाकण जवळील मेदनकरवाडी येथे एका इमारतीत मागील सहा महिन्यांपासून काळेल कुटुंब भाड्याने राहत होते. आरोपी सचिन हा एका कंपनीत कामाला होता. तर, पत्नी अश्विनी मागील काही दिवसांपासून कामाला जात होती. सचिन अश्विनीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून वारंवार तिच्याशी भांडायचा. रविवारी रात्री ही भांडणे विकोपाला गेली. सचिनने मंगळवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या अश्विनीचा आपल्या मुलींच्या समोरच सुरुवातीला गळा आवळून आणि मग चाकूने वार करून निर्घृण खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला घरातच ठेवून तीन लहान मुलींना शेजारील इमारतीत राहत असलेल्या आपल्या भावाच्या घरी नेऊन सोडले. त्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. चाकण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु होते. आरोपी सचिनच्या शोधासाठी चाकण पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा  “घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला”; सभेनंतर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया