आयपीएलच्या १५ व्या हंगामात हरभजन सिंग हा विश्लेषकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. आता हरभजन सिंग सध्या धोनी आणि २०११ च्या वर्ल्ड कपबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. हरभजनने धोनीला वर्ल्ड कप विजयाचं श्रेय देण्यावर टीका केलीय. भारताने २०११ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कपचा अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या सामन्यात धोनीने नाबाद ९१ धावांची खेळी केली होती. त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता. धोनीने षटकार खेचत भारताला दुसरा वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

हरभजन सिंहने स्टार स्पोर्ट्सवर चर्चेवेळी म्हटलं की, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकते तेव्हा हेडिंग असतं ऑस्ट्रेलियाच्या टीमने वर्ल्ड कप जिंकला आणि भारत वर्ल्ड कप जिंकतो तेव्हा हेडिंग आलं महेंद्र सिंह धोनीने वर्ल्ड कप जिंकला. मग बाकीचे काय तिथे लस्सी प्यायला गेले होते का? तर दहा जणांनी काय केलं होतं? गंभीरने काय केलं होतं? हा सांघिक खेळ आहे, जेव्हा ११ जण खेळत असतात तेव्हा सात-आठ जण चांगले खेळतील तेव्हात तुमचा संघ पुढे जाईल असंही हरभजनने म्हटलं.

अधिक वाचा  हार्दिक पटेल यांचा कॉंग्रेस पदाचा राजीनामा, कॉंग्रेसला जबर धक्का

भारताने पहिला वर्ल्ड कप १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. यानंतर २००७ मध्ये आयसीसी टी २० वर्ल्ड कप महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला. तर २०११ मध्ये भारताने वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. यानंतर २०१३ मध्ये भारताने धोनीच्याच नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनी एकमेव असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत.