मुंबई – राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

धनंजय मुंडेंना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका आल्याच्या चर्चा रंगल्या असताना अजित पवारांनी या वृत्ताचं खंडण करत मुंडेंच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसून भोवळ आल्याने त्यांची शुद्ध हरपली होती, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. तर धनंजय मुंडेंची प्रकृती आता बरी असून त्यांना अजूनही आयसीयूमध्ये (ICU) ठेवलं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात खळबळ

दरम्यान, आज दुपारी धनंजय मुंडेंना स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात येणार असून आणखी दोन ते तीन दिवस त्यांना रूग्णालयात ठेवण्यात येईल, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. तर डॉक्टरांनी मुंडेंना विश्रांती घ्यायला सांगितली असून कार्यकर्त्यांनी इथे गर्दी करू नये, असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे.