मुंबई : महावितरणाच्या भारनियमनाच्या कचाट्यात सध्या मुंबई नसली तरी कोळसा टंचाईचा विचार केल्यास वीज कंपन्यांनी अन्य स्रोतांचा विचार न केल्यास मुंबईवरही भारनियमनाचं संकट येऊ शकतं.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. मुंबईत एक सेकंद जरी वीज पुरवठा खंडीत झाला तर त्याचं मोठं आर्थिक नुकसान उचलावं लागतं. याशिवाय मुंबईत खाजगी वीज कंपन्या जादा दराने वीज पुरवठा करतात. उर्जामंत्री नितिन राऊत यांनी मंगळवारी मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यांना भारनियमनातनं वगळलं गेलं असं जरी म्हटलं असलं तरी मुंबईवरही वीजकपातीचं संकट घोंघावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  ठाकरेंचे दुसरे 'खास' राज्यसभेवर? मातोंडकर अन नार्वेकरांची चर्चा

मुंबईला वीज पुरवठा हा प्रामुख्याने अदानी,टाटा पॉवर आणि बेस्ट या तीन कंपन्या करतात. मुंबईची सध्याची रोजची वीज मागणी ३५०० मेगावॉटच्या घरात गेली आहे. त्यापैकी जवळपास १२५० ते १३०० मेगावॉट वीज ही कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पातून येते. तर ४४७ मेगावॉट वीज जलविद्युत आणि २५० मेगावॉट वीज पेट्रोलियम वायूआधारित प्रकल्पातून येते. मुंबईला वीजपुरवठा करणारे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असल्यास मुंबईला १५०० मेगावॉट वीजच बाहेरुन खरेदी करावी लागेल. परंतु, निम्म्याहून अधिक वीज औष्णिक, म्हणजेच कोळशावर आधारलेली असल्याने भारनियमनाची नामुष्की मुंबईवरही येऊ शकते.

अधिक वाचा  'हाच फडणवीस तुमच्या सत्तेच्या (बाबरी) ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही'

देशभरात स्वदेशी कोळशाच्या टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. कोळशाचा पुरवठा कमी झाल्यास वीजनिर्मितीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. टाटा पॉवर कंपनी त्यांच्या ट्रॉम्बे प्रकल्पात ७५० मेगावॉट वीज निर्मिती औष्णिक प्रकल्पातून करते. त्यासाठी इंडोनेशियाहून आयात होणारा कोळसा वापरला जातो. सध्या देशात कोळसाटंचाई असल्याने कोळशाच्या दरात भरमसाठ वाढ होतेय. त्याचा थेट परिणाम उत्पादन क्षमतेवर होतो. कोळशाचा वापर कमी केल्यास त्याचा परिणाम मुंबईच्या वीजपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कोळशावर अवलंबून न राहाता आता वीज कंपन्यांनी इतर वीज निर्मितीचे मार्ग अवलंबले पाहिजेत. मुंबईत सध्या पारा चाळीशीच्या घरात नसला तरी इथलं आर्द्र हवामान हवेत प्रचंड उष्णता निर्माण करणारं आहे. त्यामुळे येणारा दीड महिना हा वीजेची मागणी वाढवणारा असणार आहे. अशात फक्त कोळशावर अवलंबून राहिल्या मुंबईवरही भारनियमनाची नामुष्की ओढावू शकते.