आळंदी : गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी २१ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल.

यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वृध्दी झाल्याने लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहणार आहे. शिवाय दिंडीकऱ्यांच्या मागणी नुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने सहभागी दिंड्यांना वाहन पास दिले जातील अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे – पाटील यांनी दिली.

श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, विश्वस्थ डॉ. अभय टिळक, ह. भ. प. नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रंदवे, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशिनकर, शरद गायकवाड, बाळासाहेब उकळीकर, एकनाथ हांडे, दिनकर वांजळे, राजाभाऊ थोरात, बाळासाहेब वांजळे, व्यवस्थापक माऊली वीर, सहव्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते.

अधिक वाचा  सिमेंट दराचा उडाला भडका: सिमेंटच्या प्रत्येक गोणीत 55 रुपयांनी वाढ

प्रथा – परंपरेनुसार मंगळवार दि. २१ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत – गाजत माउलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. २२ व २३ जूनला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि २४ व २५ सासवड, त्यानंतर २६ जेजुरी, २७ वाल्हे, २८ व २९ लोणंद, ३० रोजी तरडगांव येथे सोहळा विसावेल. त्यांनतर १ व २ जुलैला फलटण, ३ बरड, ४ नातेपुते, ५ माळशिरस, ६ वेळापूर, ७ रोजी भंडीशेगाव, ८ वाखरी तर शनिवार दि. ९ जुलैला सोहळा श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी पोहोचेल.

अधिक वाचा  मोदी सरकारची 8 वर्षं: नोटाबंदी ते लॉकडाऊन, 'या' निर्णयांचा कसा परिणाम झाला?

पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा १० जुलैला संपन्न होईल. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.