पुणे : लष्करच्या कथीत पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाागाच्या (सीबीआय) पथकाने सोमवारी पुण्यातील लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिका-यासह आर्मी आॅर्डनन्स कोअरच्या (एओसी) शिपायाला अटक केली.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयने या अधिकाऱ्यासह आर्मी आॅर्डनन्स कोअरच्या आणखी दोन लष्करी जवानांवर, एक हवालदार आणि एक शिपाई यांच्यावर लष्करभरतीच्या उत्तरपत्रीका लीक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. यानंतर भारतीय लष्करासह सीबीआयने सयुंक्तरित्या तपास करत हे प्रकरण उघडकीस आणले होते.

पुण्यात आर्मी आॅर्डनन्स कोअरने २०१९ मध्ये लष्करातील गट ‘क’ पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून पैसे मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल दोघांना अटक केली होती. त्यानंतर २०२०-२१ मध्ये झालेल्या परीक्षेद्वारे आणखी एक हवालदार आणि लेफ्टनंट कर्नल रँकचा त्याचा नियंत्रण अधिकारी कर्मचारी दुस-या भरती प्रक्रियेत सामील असल्याचे चौकशीत समोर आले होते. गेल्या वर्षी ८ सप्टेंबर २०२१ रोजी लेफ्टनंट कर्नलने प्रश्नपत्रिकेतील उत्तरे आरोपी हवालदाराच्या पत्नीच्या मोबाईलवर पाठवले.

अधिक वाचा  ...तर हात तोडून हातात देईन, सुप्रिया सुळे भडकल्या

सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगिलतले की, लेफ्टनंट कर्नल आणि शिपायाला सोमवारी रात्री अटक करण्यात आली असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या उत्तरपत्रीका उमेदवारांना कशा लीक झाल्या आणि पैशांची देवाणघेवाण कशी झाली, यासह इतर गोष्टींचीही चौकशी सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या कारवाईनंतर दोघा संशयितांच्या विविध परिसरात शोध घेऊन गुन्ह्या संबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली.

या कारवाई बाबत सदर्न कमांडने स्पष्टीकरण दिले होते. त्यात भारतीय लष्कर भ्रष्टाचारासारख्या प्रवृत्तीना थारा देत नाही. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लष्कराकडे कडक नियम आहेत. यामुळे दोषींवर दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी जलदगतीने तपास करणे शक्य होत आहे.