पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने शेअर ब्रोकर ऋषिकेश आप्पा भोसले (रा. वनगळ, ता.सातारा) याने शहरातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांकडे आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये २४ तक्रारदार यांची ४ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. भोसले सध्या फरार आहे.

शहरातील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोठा परतावा देण्याच्या आमिषाने भोसले याने गंडा घातल्याचा प्रकार आढळून आल्यानंतर त्यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविलेल्या अनेकांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी या गुन्ह्याची व्यापकता खूपच मोठी असल्याचे दिसून आले. तक्रारदार यांचा आकडा वाढत असल्याचे पाहून या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्यात विनायक पांडुरंग बगाडे यांच्या तक्रारीवरून ऋषिकेश भोसले याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात २२ तक्रारदार यांची ३ कोटी २ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा  अयोध्येतला ट्रॅप, व्हाया राणा ते अफजल खानाची कबर... राज ठाकरेंच्या भाषणाचे हे मुद्दे

याबाबत हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील शेअर ट्रेडिंग कॅम्पसमध्ये भोसले हा शेअर मार्केट गुंतवणुकीचे मार्गदर्शन करत होता. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना भोसले याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास मोठा परतावा मिळवून देतो असे आमिष दाखविले. त्यानुसार नागरिकांनी पैसे गुंतविल्यानंतर त्याने काही दिवस परतावादेखील दिला. पण, त्यानंतर त्याने परतावा देणे बंद केले. त्यामुळे काही तक्रारदार यांनी ११ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलीस ठाण्यात भोसले याच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. या प्रकरणात आरोपी जामिनासाठी न्यायालयात गेला आहे. त्याच्या जामिनावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे.